कोची : संपूर्ण हाताचे प्रत्यारोपण करण्याची देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केरळमध्ये पार पडली. त्या राज्यातील रुग्णालयात हात प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया नुकत्याच करण्यात आल्या. ब्रेन डेड अवस्थेतील व्यक्तीचे त्यांच्या नातेवाइकांच्या संमतीनुसार अवयवदान करण्यात आले. त्यातील हातांचे प्रत्यारोपण इराक व कर्नाटकमधील दोन रुग्णांवर शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आले.
या रुग्णांपैकी अमरेश (२५ वर्षे) हा कर्नाटकातील व युसूफ हसन सईद अल् झुवैनी (२९ वर्षे) हा इराकचा नागरिक आहे. त्यापैकी अमरेश याला विनोद या व्यक्तीच्या हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले. विनोद (५४ वर्षे) हे आखाती देशामध्ये नोकरीला होते. केरळमधील आपल्या गावी आले असताना त्यांचा अपघात झाला हाेता. ब्रेन डेड झाल्यानंतर त्यांचे अवयवदान त्यांच्या नातेवाइकांच्या संमतीनुसार करण्यात आले. अमरेश यांना २०१७ साली विजेच्या धक्क्यामुळे दोन्ही हात गमवावे लागले होते. कोचीमधील खासगी रुग्णालयात अमरेश यांच्या शरीरावर विनोद यांच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्याच्या डाव्या हाताचे खांद्यापासून व उजव्या हाताचे कोपरापासून प्रत्यारोपण करण्यात आले. (वृत्तसंस्था)
इराकमधील नागरिकालाही मिळाले नवे हात२०१९ साली इराकमधील नागरिक युसूफ हसन सईद अल् झुवैनी हा भिंतीमध्ये ड्रिलिंग करीत असताना त्याला धक्का बसला. परिणामी युसूफचे दोन्ही हात निकामी झाले व कोपरापासून कापावे लागले. केरळमधील अंबिली या ब्रेन डेड अवस्थेतील महिलेचे अवयवदान तिच्या नातेवाइकांच्या संमतीने करण्यात आले. केरळमधील रुग्णालयात अंबिलीच्या हातांचे युसूफला प्रत्यारोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया १६ तास चालली.