नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. गेल्या पंधरा दिवसांत देशभरात 143.37 कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची औषधेही पकडण्यात आली आहेत. निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांमध्ये निरिक्षक नेमले आहेत. तसेच पोलिस, सीआरपीफ जवानांनाही तैनात केले आहे. सात टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे.
तामिळनाडूमध्ये जप्त केलेल्या रक्कमेचे आणि अन्य वस्तूंची किंमत 107.24 कोटी रुपये आहे. तर उत्तर प्रदेशमधील 104.53 कोटी रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 103.4 कोटी रुपये आणि पंजाबमध्ये 92.8 कोटी रुपयांची रोख रक्कम, दारू आणि नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटकमधून 26.33 कोटी, महाराष्ट्रात 19.11 कोटी आणि तेलंगानामध्ये 8.2 कोटी रुपयांचे रक्कम, दारू आणि किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य 539.99 कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाने 25 मार्चला जारी केलेल्या आकडेवारीनुसार एकूण 143.37 कोटी रुपये नकदी, 89.64 कोटी रुपयांची दारू, 131.75 कोटी रुपयांची नशेचे पदार्थ, सोने आणि अन्य किंमती वस्तूंचा समावेश असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच 162.93 कोटी रुपयांचे अन्य किंमती साहित्य आणि 12.20 कोटी रुपयांचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.