आयझोल (मिझोराम) : मिझोरामच्या राजधानीत नववर्षात आनंदी-आनंद आहे. कारण ‘जनरेशन बिटा’तील पहिले मूल आयझोलमध्ये जन्मले आहे. नववर्षाच्या पहिल्याच रात्री १२च्या ठोक्यानंतर सरकारी रुग्णालयात जन्मलेला फ्रँकी रेमरुआतदिका जेडेंग या पिढीचा भारतातील पहिला मुलगा ठरला. आतापर्यंत पालक ‘जनरेशन जी’ आणि ‘जनरेशन अल्फा’ यातील अंतर शोधत होते, तेवढ्यात जनरेशन बीटा अस्तित्वात आले आहे.
कोण ठरवते जनरेशनचे नाव?
पिढ्यांची ही नावे ठरवण्यासाठी जागतिक पातळीवर अधिकृत अशी व्यवस्था नाही. परंतु, कुणीतरी संकल्पना मांडते आणि ती नावे प्रचार-प्रसारातून जगभर प्रसिद्ध होत राहतात. २० वर्षांची एक पिढी मानली तर आधुनिक युगातील पिढ्यांची ही नावे अशीच प्रचलित झाली आहेत.
ही पिढीच असेल आगळी... १ जानेवारी २०२५ला १२.०३ वा. झाला मुलाचा जन्म
१ जानेवारी २०२५ ते २०३९ या काळात जन्मलेली मुले ‘जनरेशन बीटा’ म्हणून ओळखली जातील. ही पिढी जगाला एक नवा आकार देईल आणि ही आजवरची सर्वात स्मार्ट आणि आधुनिक पिढी मानली जाईल... कारण या पिढीसाठी प्रत्येक गोष्ट अगदी एका क्लिकवर असेल कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या युगात जन्मलेली ही पहिली पिढी असेल.
काेणती असतील आव्हाने?
जेन बीटात जन्मलेली मुले जेवढी हुश्शार तेवढीच त्यांच्यासमोर आव्हानेही मोठी असतील. पृथ्वीचे वाढते तापमान, शहरांचा वाढता विस्तार, लोकसंख्या वाढ आणि तेवढ्या प्रमाणात मूलभूत सुविधांसह पायाभूत सुविधांची गरज ही आव्हाने जेन बीटा मुलांना पेलावी लागणार आहेत. मग त्यासाठी या पिढीला सतर्क राहावे लागेल, बदल स्वीकारण्याची सतत तयारी ठेवावी लागेल, मिळून मिसळूनही राहावे लागेल.