गोरखपूर : देशातील १२ कोटी मध्यम व लहान शेतकºयांना वर्षाला प्रत्येकी सहा हजार रुपयांची रोख मदत देण्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘प्राधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे शुभारंभ केला. आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकार वर्षाला ७५ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
पाच एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकºयांना या योजनेचे सहा हजार रुपये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांत दिले जाणार आहेत. येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी या योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद््घाटन केले. मोदींनी एक बटण दाबताच एक कोटी एक हजार लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २,०२१ रुपयांची रक्कम थेट जमा झाली. इतरांचे पैसेही येत्या काही आठवड्यांत जमा होतील, असे मोदींनी सांगितले.
यावेळी ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणेने सुरु केलेल्या भाषणात मोदी यांनी स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेत असतानाच विरोधकांवर व खास करून काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, इतरांप्रमाणे आम्हाला फक्त निवडणुकीपुरता शेतकºयांचा कळवळा नाही. म्हणूनच आम्ही पैशाची तजवीज आधी करून नंतर हीयोजना जाहीर केली. एवढेच नव्हे तर घोषणेनंतर अवघ्या २४ दिवसांत ती सुरुही झाली. याने पोटशूळ उठलेले ‘महाघोटाळे’वाले अपप्रचार करून दिशाभूल करत आहेत. मोदी पैशाचे एक-दोन हप्ते देतील व निवडणूक झाली की हे पैसे बंद करतील, अशा कंड्या पिकविल्या जात आहेत. परंतु हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत व ते कोणीही काढून घेऊ शकणार नाही, याची शेतकºयांनी खात्री बाळगावी, अशी त्यांनी ग्वाही दिली. म्हणूनच मध्ये हात मारण्यासाठी कोणीही दलाल न ठेवता पूर्ण पारदर्शी पद्धतीने हीयोजना राबविण्याची व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
देशभरातील सर्व सरकारांनी संगणकीकृत महसुली रेकॉर्ड अद्ययावत करून लाभार्थींच्या याद्या लवकरात लवकर पाठवाव्या असे आवाहन करून पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार व महाराष्ट्र यासारखया राज्यांनीहे काम तत्परतेने केल्याने ही राज्ये अभिनंदनात पात्र आहेत. परंतु काही राज्य सरकारांची झोप अद्याप उडालेली नाही. त्यांनी लाभार्थींच्या याद्या लगेच केल्या नाहीत तर अन्नदात्या शेतकºयांचे शाप लागून त्यांची पार विधुळवाट होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी मोदींनी काही निवडक लाभार्थी शेतकºयांना योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप केले. नंतर त्यांनी त्याच ठिकाणाहून देशाच्या विविध भागांतील शेतकºयांशी व्हिडिओ संवादही साधला. (वृत्तसंस्था)