लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती व देशातील कोणत्याही उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश न्या. लीला सेठ यांचे नॉयडामधील राहत्या घरी निधन झाले. ८३ वर्षांच्या न्या. सेठ ख्यातनाम लेखक विक्रम सेठ यांच्या मातोश्री होत्या.न्या. सेठ यांचे दुसरे चिरंजीव शांतम यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री हृदयक्रिया बंद पडून निधन झाले तेव्हा दोन्ही मुलगे, मुलगी व इतर कुटुंबिय त्यांच्या सोबत होते. शांतम म्हणाले की, तीन आठवड्यांपूर्वी घरात पडून आईचे हाड मोडले होते. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. न्या. सेठ १९५८ मध्ये लंडनमधील वकिलीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. १९७८ मध्ये त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या व १९९१ मध्ये उच्च न्यायालायच्या (हिमाचल प्रदेश) पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या.
पहिल्या महिला न्यायमूर्ती लीला सेठ यांचे निधन
By admin | Published: May 07, 2017 1:04 AM