ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. १ - संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीरमधून सैन्य हटवण्याची मागणी करण्याऐवजी पाकिस्तानने आधी दहशतवाद संपवण्याची गरज असून पाकव्याप्त काश्मीरही त्यांनी सोडून द्यायला पाहिजे असे भारताने म्हटले आहे.
बुधवारी संयुक्त राष्ट्रातील भाषणामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. काश्मीरमधून सैन्य हटवणे, सियाचीनमधून विनाशर्त सैन्याची माघार, काश्मीरमधील जनतेचे मत जाणून घ्यावे असे विविध मुद्दे त्यांनी भाषणातून उपस्थित केले होते. शरीफ यांच्या भाषणावर भारतानेही सडेतोड उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरुप यांनी ट्विटरव्दारे शरीफ यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्ताननेच दहशतवादाला खतपाणी घातले असून काश्मीरमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करण्याऐवजी पाकने आधी त्यांच्या भूमीवरील दहशतवाद संपवावा असे प्रत्युत्तर स्वरुप यांनी दिले आहे.