नवी दिल्ली- येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात छत्तीसगडमधील 77, तेलंगणातल्या 38 आणि मिझोरममधल्या 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाची केंद्रीय निवडणूक समिती(सीईसी)च्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.छत्तीसगडमध्ये 90, तेलंगणात 119 आणि मिझोरम विधानसभेच्या एकूण 40 जागांवर या निवडणुका होत आहेत. शनिवारी पक्षाच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर केली. या सीईसीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.छत्तीसगडमधल्या भाजपाच्या पहिल्या यादीत 14 महिलांना स्थान देण्यात आलं आहे. तसेच भाजपानं छत्तीसगडमधल्या इतर 25 जागांवरून 40 वर्षांखालील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अनुसूचित जातीच्या 29 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. 12 नोव्हेंबरला छत्तीसगडच्या 18 जागांसाठी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार असून, त्याचा निकाल 11 डिसेंबरला येणार आहे. भाजपानं या 18 जागांपैकी 17 जागांवरच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात बस्तरच्या 12 आणि राजनांदगावच्या 6 जागांवर मतदान होणार आहे. विशेष म्हणजे आयएएस अधिकारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये सक्रिय झालेल्या ओ. पी. चौधरी यांनाही खरसिया जागेवरून भाजपानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तसेच मुख्यमंत्री रमण सिंह राजनांदगाव आणि छत्तीसगड भाजपाध्यक्ष बिलहा या विधानसभांच्या जागांवरून निवडणूक लढणार आहेत.त्याबरोबरच भरतपूर-सोनहत मतदारसंघातून चंपादेवी पावले, मनेंद्रगडमधून श्याम बिहारी जयस्वार, बैकुंठपूरमधून भैय्यालाला रजवाडे, प्रतापपूर मतदारसंघातून राजसेवक पॅकरा, सामरी मतदारसंघातून सिद्धनात पॅकरा, लुंड्रातून विजयनाथ सिंह, अंबिकापूरमधून अनुराग सिंहदेव, कुनकुरीतून भरत साय, रायगड मतदारसंघातून रोशनलाल अग्रवाल आणि सारंगडमधून केराबाई मनहर हे उमेदवार मैदानाच्या रिंगणात आहे. तेलंगणातही भाजपानं 38 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे, त्यात तीन महिलांनाही स्थान देण्यात आलं आहे.