नवी दिल्ली : 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन होणार आहे. मात्र, नवीन संसद कशी असेल, याबाबतचा प्रश्न देशवासियांच्या मनात निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत नवीन संसदेतील फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे.
नवीन संसद अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. सभागृहातील प्रत्येक खासदाराच्या आसनासमोर मल्टीमीडिया डिस्प्ले लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच, संसदेची रचना त्रिकोणी आकारात करण्यात आली आहे. नवीन संसदेच्या लोकसभेत 888 खासदार बसू शकतात, तर राज्यसभेत 384 खासदार बसण्याची सोय आहे. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अशोक स्तंभापासून ते खासदारांच्या बैठकीच्या खोलीपर्यंत सर्व काही दिसून येत आहे.
याचबरोबर, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. नवीन संसद दिसायला सुंदर तर आहेच, पण सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप मजबूत आहे. खासदारांच्या आसन व्यवस्थेबरोबरच येथील ग्रंथालय, विश्रामगृह आणि चेंबर्सही आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प 2019 मध्ये सुरू झाला. या अंतर्गत एक नवीन संसद भवन बांधली, जी 65400 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामावर जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संसद भवनात लोकसभेची थीम राष्ट्रीय पक्षी मोरावर तर राज्यसभेची थीम राष्ट्रीय फूल कमळावर आहे. तसेच, संसद भवनाच्या तीन दरवाजांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला बहुतांश विरोधी पक्ष विरोध करत आहेत. संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. काँग्रेससह जवळपास 20 हून अधिक विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.