नवी दिल्ली - मोबाइल हा आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या घडीला भारतात मोबाईलचे कोट्यवधी युझर्स असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र 1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती. 1995 साली भारतात मोबाइलचे आगमन झाले आणि आजच्याच दिवशी 31 जुलै 1995 रोजी भारतात पहिल्यांदा मोबाइलची रिंग खणाणली होती. 31 जुलै 1995 रोजी तेव्हाचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांना मोबाइलवरून फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. ज्योती बसू यांनी हा फोन कोलकाता येथील रॉयटर्स बिल्डिंगमधून दिल्लीतील संचार भवनमध्ये केला होता. भारतातील पहिली मोबाइल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा होती. याच कंपनीच्या सेवेला मोबाइल नेट या नावाने ओळखले जात असे. याच कंपनीच्या नेटवर्कवरून भारातातील पहिला मोबाइल कॉल करण्यात आला होता. मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा यांची संयुक्त कंपनी होती. ही कंपनी तेव्हाच्या देशातील आठ कंपन्यांपैकी एक होती ज्यांना भारताता सेल्युलर सर्व्हिस पुरवण्यासाठी परवाना मिळाला होता. मात्र 1995 साली भारतात मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य भारतीयाच्या हातात मोबाईल फोन येण्यास बराच वेळ लागला. त्याचे कारण म्हणजे मोबाइल सेवेचे असलेले महागडे दर हे होते. त्याकाळी एका आऊटगोईंग कॉलसाठी 16 रुपये प्रति मिनीट एवढा दर होता. तर इनकमिंग कॉलवरही ठरावीक शुल्क आकारले जाई. भारतात मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत मोबाइल युझर्सची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मात्र हा आकडा वेगाने वाढला. आज भारतातील 65 टक्क्यांहून अधिक लोकांकडे मोबाइल आहेत.
23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 10:00 AM