पुणे : विश्व मराठी परिषदेने २८ ते ३१ जानेवारीदरम्यान ऑनलाईन विश्व मराठी संमेलन आयोजित केले आहे. यात एकदिवसीय स्वतंत्र विश्व मराठी युवक संमेलनाचाही समावेश आहे. सुमित्रा महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकाच्या अध्यक्ष विद्या जोशी संमेलनाच्या महासंरक्षक असतील.
संमेलनासाठी २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्ष असून लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, कविकट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा - कल्पनांचे सादरीकरण, वडिलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा - सांगेन गोष्टी युक्तिच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण असे उपक्रम सादर होणार आहेत.
संमेलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात येत असून त्यावर संमेलनाची विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. देश,विदेशातील मराठी बांधवांनी संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नि:शुल्क नोंदणी करण्यासाठी www.sammelan.vmparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. देश-परदेशातील मराठी भाषिकांनी या संमेलनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले आहे.
संमेलनामध्ये सुमारे ३२ देशातील, अमेरिकेतून ४० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिक बांधव तसेच १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महविद्यालये सहभागी होत आहेत. -------- संमेलनामध्ये प्रथमच ९ जणांचे अध्यक्षीय मंडळ
डॉ. अनिल काकोडकर हे महासंमेलनाध्यक्ष असून साहित्य विभाग - भारत सासणे आणि डॉ. विनता कुलकर्णी, शिकागो, - संस्कृती विभाग - सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, फ्रॅंकफर्ट, उद्योजक विभाग - डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल कुलकर्णी, लंडन, युवा विभाग - उमेश झिरपे आणि अजित रानडे जर्मनी हे संमेलनाध्यक्ष असतील.