बडोदा : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२३ मध्ये ५०८ किमीचे अंतर धावणार आहे. त्यापूर्वी गुजरातमध्ये सूरत ते बिलिमोरापर्यंत पहिली बुलेट ट्रेन २०२२ मध्ये चालविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ५० किमीचे हे अंतर ट्रेन केवळ १५ मिनिटांत पूर्ण करणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त १५ आॅगस्ट २०२२ मध्ये पहिली बुलेट ट्रेन चालविण्याचा एनडीए सरकारचा मानस आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी सांगितले की, सर्वप्रथम बुलेट ट्रेन धावण्यासाठी हा सरळ मार्ग निवडण्यात आला. तथापि, आगामी फेब्रुवारीत या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. बुलेट ट्रेनबाबतचे प्रशिक्षण लवकरच भारतात सुरू होणार आहे. बुलेट ट्रेनचा एक भाग असलेल्या हाय स्पीड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची निर्मिती सुरू आहे. या संस्थेसाठी ६०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. २०२३ पर्यंत जवळपास ३५०० कर्मचाऱ्यांची गरज पडणार आहे. १५०० भारतीय अधिकाºयांनी जपानकडून प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षणाची एक बॅच आॅक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. १६६ खोल्या आणि ३३४ बेडची येथे व्यवस्था आहे. या ठिकाणी बुलेट ट्रेनचा ५० मीटरचा ट्रॅकही आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पाच मजली इमारतीचे दोन मजले तयार होतील.