अयोध्या: अयोध्येतील भगवान श्री रामाच्या मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या बांधकामाची माहिती सार्वजनिक केली आहे. मंदिर बांधकामाच्या माहितीसाठी आज पहिल्यांदाच ट्रस्टने मीडियाला रामजन्मभूमी संकुलात कव्हरेज करण्याची संधी दिली. मंदिराच्या बांधकामासाठी 48 थरांचा पाया रचला जात असून, 47 थर तयार झाले आहेत.
याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, मंदिर बांधणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आज पाऊस पडला नसता तर शेवटचा 48 वा थरही झाला असता. मंदिराचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी श्री रामाचे गर्भगृह तयार करायचे आहे, त्या ठिकाणी 14 मीटर जाड आणि उर्वरित ठिकाणी 12 मीटर जाड दगड टाकण्यात आले आहेत. आता लवकरच दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरूराम मंदिर निर्माणाचे काम करणाऱ्या एलएनटी कंपनीचे इंजीनियर विनोद मेहता म्हणाले की, मंदिराच्या पायासाठी 48 थर तयार केले जात आहेत. आतापर्यंत 47 थर झाले असून, लवकरच 48 वा थर पूर्ण होईल. हा थर पूर्ण झाल्यानंतर त्यावर काँक्रीटचा अखंड थर तयार केला जाईल. यानंतर 6 मीटरचे खांब बांधले जातील, ज्यात मिर्झापूरचे दगड आणि ग्रॅनाइट्सचा वापर करण्यात आला आहे. यावर 161 फूट उंचीवर श्री राम विराजमान होतील.