पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १२ आॅक्टोबरला मतदान होत असून यासाठीच्या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. उमेदवारांनी आता घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा धूमधडाका लावला आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला असून नक्षलवादी आणि अन्य समाजकंटकांवर जल, थल आणि वायूमार्गे नजर ठेवण्यासोबत प्रथमच ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.राज्याचे अवर मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात ४९ जागांसाठी मतदान होणार असून एकूण ५८६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १८ उमेदवार मोहिउद्दीननगर आणि मोरवा येथून रिंगणात आहेत, तर वारिसलीगंजमध्ये सर्वात कमी सहा उमेदवार भविष्य अजमावत आहेत. सहा जिल्हे नक्षलग्रस्तपहिल्या टप्प्यात ज्या १० जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यात समस्तीपूर, बेगुसराय, खगडिया, लखीसराय, शेखपुरा, भागलपूर, मुंगेर, बांका, नवादा आणि जमुईचा समावेश आहे. यापैकी सहा जिल्हे नक्षलग्रस्त असून तेथील बहुतांश मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत.निवडणूक आयोगाने या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मतदान शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे आदेश दिले आहेत. या भागात निमलष्करी दलाचे दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच मतदानाच्या दिवशी नक्षलवाद्यांच्या हालचाली टिपण्याकरिता प्रथमच ड्रोनचा वापर केला जाणार असून याद्वारे मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे सुरक्षा जवान संभाव्य ठिकाणांवर त्वरित कारवाई करू शकतील. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंगेर, खगडिया, लखीसराय, बांका, नवादा आणि जमुई जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वीच निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी इ.स. २००० सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रोहतास जिल्ह्यात चैनपूरजवळ भूसुरुंग स्फोटात पोलिसांची जीप उडविली होती. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) आठ जवान शहीद झाले होते. २००५ च्या निवडणुकीत शिवहर जिल्ह्यात श्यामपूर भटहाजवळ स्फोटात सहा जवान शहीद झाले होते. (वृत्तसंस्था)माओवाद्यांचे बहिष्काराचे आवाहनदुसरीकडे नेहमीप्रमाणे माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली असून ठिकठिकाणी यासंदर्भात पोस्टर्स लावले आहेत. नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भागात त्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचे प्रचार वाहन अथवा स्वत: उमेदवाराला प्रवेश करता येत नाही. यासाठी उमेदवाराला संबंधित क्षेत्राच्या स्वयंभू एरिया कमांडरची परवानगी घ्यावी लागते. हे लक्षात घेता या संपूर्ण भागात हेलिकॉप्टरने पाळत ठेवली जाणार आहे. शिवाय नद्यांमध्ये मोटर बोट सशस्त्र जवानांसह सज्ज राहतील. राज्यालगतची झारखंड सीमा शुक्रवारी रात्रीच सील करण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या
By admin | Published: October 11, 2015 3:38 AM