नवी दिल्ली: भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला.
चांद्रयान-३ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर एक संदेश पाठवला आहे. "मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे"; असा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर आता चांद्रयान-३ने चंद्रावर पोहताच पहिला फोटो पाठवला आहे. या फोटोमध्ये चंद्रावरील दक्षिण ध्रुवाचा भाग कसा दिसतो, हे या फोटोमधून स्पष्ट होत आहे. इस्रोने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
चंद्रयान३चे प्रज्ञान रोवर चंद्रावरील पाणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे, कधीही सूर्यप्रकाश पडलेला नाही. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोवरसाठी ऐतिहासिक असेल. रोवरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली सर्व माहिती रोवर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवणार आहे.
दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.