ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - लोकशाहीत मतदार हा महत्त्वाचा घटक असून देशातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन करत 'आधी मतदान मग जलपान' असा नाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली असली तरी कार्यक्रमात निवडणुकीविषयी भाष्य करता येणार नाही अशी अटही घातली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या मन की बातमध्ये नेमकं काय बोलतील याविषयी कमालीची उत्सुकता होती. मन की बात या कार्यक्रमाचा आज १२ वा भाग प्रसारित झाला असून या कार्यक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी देशवासियांची आभार मानले. मन की बातमध्ये मी बोलत असलो तरी विचार जनतेचेच असतात असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी मी आवाहन केल्यानंतर खादीच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली होती.यंदाही २ ऑक्टोबरला खादीचे वस्त्र विकत घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.