नवी दिल्ली, दि. 16 - एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. एअर इंडियाने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही दलातील जवानांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून देशातील सर्व विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जगातील काही देशांमध्ये विमानात प्रवेश करताना जवानांना पहिल्यांदा सोडले जाते. त्याच धर्तीवर एअर इंडियाने हा निर्णय अवलंबला असल्याचे समजते. दरम्यान, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक सरबजोत सिंग उबेरॉय यांनी ई-मेलद्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत.
याचबरोबर, देशासाठी लढणा-या जवानांच्या योगदानाचा आमच्याकडून उचित सन्मान व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रथम जवानांना आणि बिझनेस श्रेणीच्या प्रवाशांच्या आधी चढू दिले जाणार आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वानी लोहानी यांनी सांगितले की, यासोबतच जवानांना देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यात काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे.
आणखी वाचा -(एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल)(एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य)(...तर टाटा ग्रुप एअर इंडिया कंपनी खरेदी करेल- रिपोर्ट)