अहमदाबाद – गुजरातच्या नेतृत्वात बदल केल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु कॅबिनेट विस्तारात भाजपातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल कॅबिनेटमध्ये मोठे बदल करू इच्छित आहेत. ज्यामुळे पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे गुजरातच्या मंत्रिमंडळाचा दुपारी होणारा शपथविधी सोहळा पुढे ढकलला आहे.
विजय रुपाणी, नितीन पटेलसह अन्य नेते नाराज
मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र पटेल(Bhupendra Patel) यांच्या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, मंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा नाराज आहेत. सध्या उपमुख्यमंत्री असलेले नितीन पटेल यांना केवळ मंत्रिपदावर समाधान मानावं लागू शकतं. ज्यामुळे पक्षातील वाद उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९० टक्क्यांहून अधिक मंत्र्यांना हटवण्यावर विचार केला जात आहे. केवळ १-२ जणांनाच मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल. भाजपाचे अनेक आमदार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे पोहचले आहेत. यात ईश्वर पटेल, ईश्वर परमार, बचु खाबड, वासण आहीर, योगेश पटेल यांचा समावेश आहे.
गुजरातमध्ये नवे मंत्री घेणार शपथ
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, नव्या मंत्र्यांची नावं अद्याप घोषित केले नाहीत. परंतु हे मंत्री संध्याकाळी राजधानी गांधीनगर येथे शपथ समारंभात उपस्थित राहतील. भूपेंद्र पटेल त्यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जुन्या नेत्यांची जागा नवे युवा नेते घेतील. त्याचसोबत महिलांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे. जातीय संतुलन राखण्यासाठी चांगल्य प्रतिमेच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.
विजय रुपाणी-नितीन पटेल नेतृत्वात निवडणूक लढवणार होते
२७ दिवसांपूर्वीच भाजपानं आगामी २०२२ विधानसभा निवडणूक विजय रुपाणी-नितीन पटेल यांच्या जोडीसोबत लढणार असल्याचं जाहीर केले. नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी जेव्हापासून अहमदाबाद सोडून दिल्लीचं तख्त सांभाळलं आहे. तेव्हापासून गुजरातमध्ये भाजपाच्या नेतृत्वावर संकट येत आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर आनंदी बेन पटेल यांनी कमान सांभाळली. परंतु त्यांच्याविरोधात लोकांचा आक्रोश वाढला त्यानंतर भाजपाने नेतृत्वात बदल करुन विजय रुपाणी यांच्यावर जबाबदारी दिली. अलीकडेच विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाची ५ वर्ष पूर्ण केली. १६ ऑगस्ट रोजी गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांनी आगामी निवडणूक विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं विधान केले होते. गुजरातमध्ये अनेक दिवसांपासून नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यावेळी पक्षाने रुपाणी-पटेल जोडी चांगले काम करत असून बदल करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं.