इंदूर : मध्य प्रदेशच्या व्यावसायिक परीक्षा मंडळातर्फे (व्यापमं) आयोजित प्रवेश परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपात जिल्हा न्यायालयाने शनिवारी राजस्थानमधील एका स्कोअररसह दोन आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘व्यापमं’ घोटाळ्यात जिल्हा न्यायालयाने दिलेला हा पहिलाच निकाल आहे.विशेष अपर सत्र न्यायाधीश डी. के. मित्तल यांनी व्यापमं घोटाळ्यातील आरोपी आणि राजस्थानच्या भिलवाडा येथील रहिवासी अक्षत सिंग राजावत (२५) आणि मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्णातील प्रकाश बारिया (२८) या दोघांना भादंविच्या कलम ४२० (फसवणूक), ४६८ (फसविण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार करणे) आणि मध्य प्रदेश मान्यताप्राप्त परीक्षा कायद्याअंतर्गत दोषी ठरविताना ही शिक्षा सुनावली. आरोप सिद्ध करण्यासाठी ११ साक्षीदार सादर केले गेले. पशुपालनच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेशासाठी व्यापमंने आयोजित केलेल्या परीक्षेवेळी बारियाने इंदूरच्या एका परीक्षा केंद्रात आपल्या जागी राजावत याला ‘मुन्नाभाई’ बनवून पाठविले होते. परंतु फोटो दुसराच असल्याने ही बनवाबनवी पर्यवेक्षकांच्या लक्षात आली आणि पितळ उघडे पडले.
व्यापमं घोटाळ्यातील पहिला निकाल
By admin | Published: December 27, 2015 12:26 AM