ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 9 - जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद आणि अण्णाद्रमुकवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लढाईत पहिली फेरी व्ही.के.शशिकला यांनी जिंकली आहे. बुधवारी अण्णाद्रमुकची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला अण्णाद्रमुकच्या 134 पैकी 120 आमदार उपस्थित होते. शशिकला यांच्या गोटातून त्यांना 129 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शशिकला यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला उपस्थित असणा-या आमदारांना सध्या चेन्नई येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान राज्यपाल सी.विद्यासागर राव जाणीवपूर्वक आपल्या शपथविधीला विलंब लावत आहेत असा आरोप शशिकला यांनी केला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी असून ते सध्या मुंबईत आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हस्तक्षेप करावा यासाठी शशिकला समर्थक मंत्री, आमदार, खासदार आज राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात. शशिकला यांनी पक्षावर वर्चस्व मिळवले असले तरी, त्यांना जनतेची मने जिंकता आलेली नाहीत. तामिऴी जनतेमध्ये पनीरसेल्वम स्वत:साठी सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरले असून, त्यांनीच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे अशी तामिळी जनतेची भावना आहे.