नवी दिल्ली: गोमांस बाळगल्याप्रकरणी जमावाकडून मारहाण झाल्याच्या अनेक घटना मध्यंतरी सातत्याने कानावर पडत होत्या. याप्रकरणी बुधवारी झारखंडमधील जलद गती न्यायालयाने (फास्ट ट्रॅक) महत्त्वपूर्ण निकाल दिला. गेल्यावर्षी जून महिन्यात झारखंडच्या रामगढ येथे अलिमुद्दीन अन्सारी (55) यांना गोमांस बाळगल्याप्रकरणी जमावाने ठार मारले होते. याप्रकरणी आज न्यायालयाने खटल्यातील 12 दोषी आरोपींपैकी 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोमांस बाळगल्याच्या संशयातून लोकांना ठार मारणाऱ्या एखाद्या जमावाला न्यायालयाने शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या निकालामुळे भविष्यात अशा घटनांना चाप बसू शकतो. निकालानंतर दोषींना कोर्टाबाहेर आणताना जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्याचंही वृत्त आहे. या निर्णयाविरोधात झारखंड उच्च न्यायालयात जाणार असल्याचं दोषींच्या वकिलांनी सांगितले. जलदगती न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश ओम प्रकाश यांनी हा निकाल दिला. त्यांनी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर दोषींना जन्मठेप सुनावली. तसेच जिल्हा कायदा नियामक यंत्रणेला पीडिताच्या कुटंबीयांना योग्य तो मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश दिले. गेल्यावर्षी जून महिन्यात रामगढमधील अलिमुद्दीन अन्सारी (55) यांना गाडीतून गोमांसाची वाहतूक केल्याच्या संशयावरून गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये अन्सारी यांचा मृत्यू झाला होता. जमावाने अन्सारी यांची गाडीही पेटवून दिली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती.
गोमांस बाळगणाऱ्या व्यक्तीला ठार मारणाऱ्या 11 जणांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 8:15 PM