Lok Sabha First Session : लोकसभा निवडणुकीतील देशाच्या १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब सर्व खासदारांना शपथ देतील. यासोबतच सभापतीपदासाठीही निवडणूक होणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात भाषण केले. यावेळी पंतप्रधानांनी आणीबाणीच्या निमित्ताने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. २५ जून हा अविस्मरणीय दिवस असल्याचे म्हणत त्या दिवशी आपल्या लोकशाहीचे तुकडे झाल्याचे मोदींनी म्हटलं.
१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि संसदेचे कामकाज चालवण्यासंदर्भात विरोधकांना सल्ला दिला. यावेळी बोलताना, "नव्या संसदेत पहिल्यांदाच शपथविधी होणार आहे. आजचा दिवस अभिमानाचा आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. सुमारे ६५ कोटी लोकांनी मतदानात भाग घेतला. ही निवडणूकही महत्त्वाची आहे कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही संधी ६० वर्षांनंतर आली आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांकडून आणीबाणीचा उल्लेख
"देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. विरोधक लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील आणि जनतेचे प्रश्न मांडतील, असा आम्हाला विश्वास आहे. उद्या २५ जून आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी २५ जून हा दिवस अविस्मरणीय आहे. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासला गेला आणि त्याला ५० वर्षे पूर्ण करत आहे. त्यावेळी भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली आणि देशच तुरुंगात बदलला. ५० वर्षांपूर्वी जे केले होते ते भारतात पुन्हा कोणी करण्याची हिम्मत करू नये असा संकल्प आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक - पंतप्रधान मोदी
"जर आपल्या देशातील नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला असेल तर याचा अर्थ त्यांनी सरकारच्या धोरणांना आणि हेतूंना मान्यता दिली आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे," असे पंतप्रधानांनी म्हटलं.
दरम्यान, २७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यानंतर २८ जूनपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी २ किंवा ३ जुलै रोजी चर्चेला उत्तर देतील. २४ जून ते ३ जुलै या कालावधीत हे अधिवेशन सुरू होणार असून या १० दिवसांत एकूण ८ बैठका होणार आहेत.