श्रीनगर : स्थिती अनुकूल असेल त्यावेळी जम्मू-काश्मिरातील वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्सपा) हटविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले. राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या राजनाथसिंह यांनी सर्वप्रथम अमरनाथ गुफा मंदिरात पूजाअर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जम्मू-काश्मिरातील स्थिती लवकरात लवकर अनुकूल व्हावी, अशी आमची इच्छा आहे. याशिवाय देशात कुठेही आफ्सपा लावण्याची वेळ येऊ नये, अशी मी देवाला प्रार्थना करील, असे राजनाथ म्हणाले. फुटीरवाद्यांशी चर्चेसंदर्भात सरकारकडे कुठलाही प्रस्ताव नाही. कुणाशीही चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मात्र राष्ट्रविरोधी कारवायांचा विरोध केला गेला पाहिजे.जम्मू-काश्मिरातील सुरक्षा स्थिती बिघडू दिली जाणार नाही; पण यासाठी जनतेचे सहकार्यही गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आफ्सपा रद्द करणे हा जम्मू-काश्मिरातील भाजप-पीडीपी आघाडी सरकारमधील किमान समान कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. याच आधारावर राज्यात भाजप-पीडीपी आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ यांची उपरोक्त स्पष्टोक्ती महत्त्वपूर्ण आहे.(वृत्तसंस्था)
‘अफ्सपा’ मागे घेण्याचे प्रथमच संकेत
By admin | Published: July 03, 2015 2:47 AM