श्रीनगर - पावसाळा सुरु झाल्यानंतर मुंबईकर आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना डोंगर द-यातून वाहणारे धबधबे खुणावू लागतात. पर्यटकांची पावले आपसूकच धबधब्याकडे वळतात. तसचं हिवाळा सुरु झाल्यानंतर उत्तर भारतातील पर्यटक बर्फवृष्टीची वाट पाहत असतात. काश्मीर, सिमला, मनालीमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी होताच तिथे पर्यटकांची मोठया संख्येने गर्दी होते. बुधवारी पहाटे काश्मीरच्या जनतेने मोसमातील पहिलीच बर्फवृष्टी अनुभवली.
या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये पारा खाली घसरला आहे. सोनमर्ग, गंदरबाल जिल्हा आणि आसपासच्या भागांमध्ये बुधवारी पहाटे तीन-चारच्या सुमारास बर्फवृष्टी झाली. या परिसरातील डोंगररांगांनी सफेद चादर अंगावर ओढल्याचे चित्र आहे. जम्मू-श्रीनगरच्या काही भागात पाऊसही कोसळला.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मूमध्ये पाऊस कोसळेल तसेच काश्मीरमध्ये उंचावरील प्रदेशात आणखी बर्फवृष्टीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातही उंचावरील भागांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हिमाचलच्या काही भागात मंगळवारी पाऊस कोसळला आजही हा पाऊस सुरु आहे. पंजाब, राजस्थानमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या. स्कायमेटनुसार हरयाणा, दिल्लीमध्ये आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसतील.