मुुंबई : राम कदम यांच्या भाजपा प्रवेशामुळे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली आहे. कदम यांना भाजपासह शिवसेनेतून होत असलेला प्रखर विरोध हे त्याचे प्रमुख कारण. भाजपाचे साऊथ इंडियन सेलचे सचिव विजय शेट्टी यांच्या रूपाने कदमविरोधातली पहिली ठिणगी पडली आहे. शेट्टी यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे.राम कदम निवडून आल्यानंतर मतदारसंघात न झालेला विकास, विकासकामांऐवजी देवदर्शनाच्या दिखाऊपणाबाबत सातत्याने भाजपा-शिवसेनेने कदम यांच्याविरोधात प्रचार केला. त्याच कदमांना भाजपातर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने जनतेला तोंड कसे दाखवणार, यावरून भाजपा अस्वस्थ आहे. त्यातच कदम यांना घेण्याबाबत आपली मते पक्षाने जाणून घेतलेली नसल्याने भाजपा पदाधिकारी आणखी चवताळले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील पदाधिकारी बंडखोरीची भाषा करीत आहेत.ईशान्य मुंबई जिल्हा समितीचे सदस्य आणि साऊथ इंडियन सेलचे सचिव शेट्टी यांनी कदम यांच्याविरोधात अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार वर्षानुवर्षे आम्ही प्रामाणिकपणे केल्याने पक्षाने एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांपैकी एकाची निवड उमेदवारीसाठी करणे आवश्यक होते. मात्र त्याऐवजी पक्षाने उपरा उमेदवार लादत आमच्यावर अपक्ष लढण्याची पाळी आणली आहे. (प्रतिनिधी)
कदमविरोधाची पहिली ठिणगी
By admin | Published: September 24, 2014 2:49 AM