इंफाळ : हिंसाचाराने पेटलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित हाेण्याची आशा पल्लवित झाली आहे. एकमेकांच्या जिवावर उठलेल्या कुकी आणि मैतेई समुदायाने प्रथमच शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जिरिबाम येथे दाेन्ही पक्ष जाळपाेळ आणि गाेळीबाराच्या घटना राेखण्यासाठी सुरक्षा दलांना सहकार्य करतील आणि परिस्थिती सामान्य करण्याच्या दिशेने काम करतील.
जिरिबाम येथे सीआरपीएफच्या केंद्रात कुकी आणि मैतेई समुदायाच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. त्यात दाेन्ही समुदायांमध्ये शांततेसाठी सहकार्य करण्याचे ठरले.
हिंसेचे २२५ बळी
मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून झालेल्या हिंसाचारात २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. ५९,४१४ लाेक विस्थापित झाले असून त्यांना ३०२ शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. ११,१३३ घरे जाळण्यात आली. ४,५६९ घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.