- शीलेश शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार सहमतीचा असावा यासाठी भाजप नेत्यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची येथे भेट घेतली खरी, परंतु उमेदवाराचे नाव जाहीर न करण्याच्या भूमिकेमुळे ही बैठक निष्फळ ठरली.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि सूचना व प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधींकडे पाठिंबा मागितला. तुम्ही कोणत्या उमेदवारासाठी पाठिंबा मागत आहात, असे सोनियांनी विचारताच तुम्हाला कोणता उमेदवार अपेक्षित आहे?, असा प्रतिप्रश्न भाजप नेत्यांनी त्यांना केला. उमेदवार कोण याबद्दल सध्या सत्ताधारी आणि विरोधक बोलायला तयार नसल्याने, बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. भाजपचा उमेदवार निश्चित होईपर्यंत काँग्रेस व अन्य विरोधक काहीच प्रतिक्रिया व्यक्त करणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मंत्री कोणती तरी नावे घेऊन येतील, असा आमचा समज होता. परंतु त्यांना विरोधकांकडून कोण उमेदवार असेल हे हवे होते, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नंतर म्हणाले. सोनियांंसोबत आझाद, मल्लिकार्जुन खरगे व अहमद पटेल उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाला उमेदवाराचे नाव देण्यासाठी आम्ही आणखी एक संधी देऊ , असे विरोधकांचे म्हणणे आहे. माकपचे सीताराम येचुरी म्हणाले की, भाजप ज्या पद्धतीने सहमती करू पाहात आहे ते पाहता, आपण फार आशावादी राहू नये. या प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांनी आधीच खूप उशीर केला आहे व आता नावही जाहीर करीत नाही तरीही ते विरोधकांकडून कोणत्या उमेदवाराला पाठिंबा मागत आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती राज्यघटनेची संरक्षण करणारी व धर्मनिरपेक्ष प्रतिमा असलेली हवी, असे आमचे म्हणणे आहे. राजनाथ सिंह व नायडू यांनी सीताराम येचुरी यांचीही भेट घेतली. राष्ट्रपतींना भागवत भेटलेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची येथे भेट घेतली. उभयतांनी एकत्र जेवण केले. ही भेट शिष्टाचाराचा भाग होती, असे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले असले तरी या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर काँग्रेसने राष्ट्रपती त्यांना हवे त्याला भेटीसाठी वेळ देऊ शकतात, असे म्हणून काही भाष्य करण्यास नकार दिला.
आधी ‘उमेदवार’ सांगा!
By admin | Published: June 17, 2017 12:27 AM