नवी दिल्ली - राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची मूठ बांधण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळेच, शरद पवार यांच्या नेृत्त्वात महाविकास आघाडी सद्यातरी भक्कम आहे. त्यातच, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. ठाकरे स्वत: पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहचले होते. या भेटीची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर, आज काँग्रेस नेतृत्वासह शरद पवार यांची राजधानी दिल्लीत चर्चा झाली. त्यामुळे, आधी ठाकरे, पुन्हा गांधी, पण शरद पवारच राजकारणाच्या केंद्रस्थानी असं चित्र दिसून येत आहे.
देशातील मोदी सरकारला प्रखर विरोध करण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी याज काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केली. तसेच, इतरही पक्षांसोबत बोलणी करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत व्यक्त केलेली नाराजी, तसंच फडतूस-काडतूस वादावरुनही ठाकरे यांना सुनावलेले खडे बोल या पार्श्वभूमीवर ही ठाकरे-पवार भेट झाल्याचं बोललं गेलं. ठाकरे-पवार भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर, आज
मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदाणी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी यावरुन पवार यांनी घेतलेली वेगळी भूमिका यामुळे महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याची चर्चा आहे. तर, राहुल गांधींच्या भूमिकेवरही पवार यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी दर्शवली होती. त्यामुळे, आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हेही उपस्थित होते.
देशात सरकारी संस्थांचा दुरुपयोग होत आहे, युवकांजवळ रोजगार नाही. महागाई वाढत आहे, आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावरही गदा आणली जात आहे. त्यामुळे, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी, तसेच देशाला वाचविण्यासाठी एकत्र येऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधींच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.