ऑनलाइन लोकमत
गुवहाटी, दि. 26 - सरकारला तीनवर्ष पूर्ण झाल्याबद्दल आसामच्या गुवहाटीमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार मानले. आम्हाला सरकार बनवण्याची, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो असे मोदी म्हणाले. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात 125 कोटी देशवासियांनी आम्हाला साथ दिली असे मोदी म्हणाले.
आमच्या सरकारने गरीबांच्या विकासासाठी त्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले असे मोदींनी सांगितले. यापूर्वी देशात काळे धन होते आता जनधन आणि डीजी धन आहे. आम्ही 1 हजार गावे ऑप्टीकल फायबरने जोडली. यापुढेही आम्ही आमचे काम चालू ठेवू असे मोदी म्हणाले.
मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी म्हणाले. 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी बेनामी संपत्ती कायद्याचे उदहारण दिले.
1988 साली बेनामी संपत्तीसंबंधी कायदा झाला पण 28 वर्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही असे त्यांनी सांगितले. लोकांनीच स्वच्छ भारताला मोठी चळवळ बनवली. प्रसारमाध्यमांनी यात महत्वाची भूमिका बजावली. देशाला पुढच्या पाचवर्षात नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा संकल्प करुया. एक नव भारत उभारुया असे मोदी म्हणाले.
दरम्यान आज सकाळी मोदींनी आसाममध्ये लोहीत नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया पूलाचे लोकार्पण केले. आसाम आणि अरुणाचल या दोन राज्यांना जोडणारा हा पूल आर्थिक क्रांती घडवेल आणि महासत्ता बनण्यामध्ये देशाला उपयोगी ठरेल असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. आसाम आणि अरुणाचलच्या जनतेला हा पूल एकत्र आणेल असे मोदी म्हणाले. प्रसिद्ध गायक भूपेन हजारीका यांचे नाव पूलाला देण्याची घोषणा मोदींनी केली.
विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्याचे मोदींनी सांगितले. आसाममधल्या ढोला आणि अरुणाचलमधल्या सदिया यांना जोडणारा हा पूल पूर्वोत्तर राज्यांसाठी दळणवळण क्रांती ठरणार असल्याचं सांगितलं जातं आहे. सध्या या दोन ठिकाणांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 6 तासांचा प्रवास करावा लागतो तो आता फक्त 1 तासावर येणार आहे.
शिवाय 165 किमीचं अंतरही वाचणार आहे. ज्यामुळे दिवसाला 10 लाख रुपयांचं इंधन वाचेल असा दावा सरकार करतं आहे. चीन सीमेवर तातडीनं हालचाली करण्यासाठी, अवजड टँक आणि इतर शस्रांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी हा पूल फायद्याचा ठरणार आहे.