नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त मोठी कारवाई करत पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याच्या सर्व सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला. बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैसेचे दहशतवादी तळ हवाई दलाने उद्ध्वस्त केले. मध्यरात्री 3 ते 3.30 दरम्यान मिराज 2000 विमानांनी धडाकेबाज कारवाई केली.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला 10 पेक्षा अधिक दिवस उलटून गेले असताना भारतीय हवाई दलाने केलेली कारवाई अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. 1971 नंतर प्रथमच हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कारवाई केली. गेल्या 47 वर्षांमध्ये हवाई दलाने अशा प्रकारची कारवाई करुन दाखवली. याआधी 1971 च्या युद्धावेळी भारताने अशी कारवाई केली होती. या कारवाईत जैशचे टॉप कमांडर आणि ट्रेनर मारले गेल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी दिली.
2016 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. मात्र त्यावेळी असा कोणत्याच प्रकारचा हल्ला झाला नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पाकिस्तानने दिलेली प्रतिक्रिया अगदी उलट आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या कारवाईचा इन्कार करणाऱ्या पाकिस्तानने यावेळी स्वतःच या हल्ल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. 8 वाजून 36 मिनिटांनी पाकिस्तानने अधिकृतपणे व्हिडीओ जारी केला.
खैबर पख्तुन प्रांतात भारतीय हवाई दलाने कारवाई अतिशय धाडसी होती. पाकिस्तानला दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव होता. त्यामुळे पुलवामातील हल्ल्यानंतर लगेचच सीमेजवळील दहशतवाद्यांचे तळ हटवण्यात आले. अशी कारवाई होऊ शकते, यासाठी पाकिस्तानही सज्ज होता. त्यामुळेच खैबर पख्तुनमध्ये 12 मिराज 2000 विमानांनी केलेल्या कारवाईसाठी तिथल्या काही डीप असेट्सची मदत घेण्यात आली. यासाठी आग्रा आणि बरेलीच्या विमानतळांचा वापर करण्यात आला.
रात्रीच्या वेळी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून कारवाई करणं आव्हानात्मक होतं. पाकिस्तानच्या एफ-16 विमानांकडून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शक्य तितक्या कमी वेळात ही कारवाई पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यामुळे अवघ्या 20 ते 30 मिनिटांमध्ये भारतीय हवाई दलाच्या शूर वैमानिकांनी कारवाई पूर्ण केली. यावेळी पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी कारवाईसाठी उड्डाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र भारताची कारवाई इतकी वेगवान होती की, पाकिस्तानच्या विमानांनी उड्डाण करण्याआधीच भारतीय विमानं अगदी सुरक्षितपणे माघारी परतली.