ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - प्रवाशांअभावी 'पॅलेस ऑन व्हील्स'ची फेरी रद्द करण्याची वेळ ओढवली आहे. ३४ वर्षात प्रथमच या ट्रेनची फेरी रद्द झाली आहे. नावाप्रमाणे या ट्रेनच्या प्रवासात राजेशाही थाटाचा अनुभव मिळतो. २००७-०९च्या दरम्यान जागतिक मंदी असतानाही या ट्रेनची फेरी रद्द झाली नव्हती. त्यावेळीही या गाडीला प्रवाशांकडून मिळणार प्रतिसाद कमी झाला नव्हता.
पॅलेस ऑन व्हील्सची आधीची फेरी होळीच्यावेळी झाली होती. त्यावेळीही १०४ प्रवाशांची क्षमता असूनही फक्त आठ जागांसाठी बुकिंग झाले होते. पॅलेस ऑन व्हील्स ट्रेन चालवण्याचा खर्च प्रचंड मोठा आहे. कमी प्रवाशांमध्ये ही गाडी चालवणे व्यवहार्य नसल्याचे या गाडीचे जनरल मॅनेजर प्रदीप बोहरा यांनी सांगितले.
या ट्रेनला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद कमी झाला असून, पुन्हा प्रवासी संख्या वाढवण्यासाठी नव्या योजनांची आवश्यकता आहे. या ट्रेनने एक मार्गी प्रवासासाठी प्रतिमाणसी अडीचलाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो.
भारतीय रेल्वेने २६ जानेवारी १९८२ रोजी राजस्थान पर्यटन विभागाच्या सहकार्याने पॅलेस ऑन व्हील्सची सेवा सुरु केली. जगातील ही आलिशान रेल्वे प्रवासाचा अनुभव देणा-या ट्रेनपैकी एक आहे. सात रात्री आणि आठ दिवसाच्या प्रवासाला नवी दिल्लीपासून सुरुवात होते.