कूचबिहार (पश्चिम बंगाल) : १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कूचबिहार जिल्ह्यातील ५१ वस्त्यांत (परदेशी मुलखाने वेढलेला प्रदेश) राहणारे ९ हजारांहून अधिक लोक पाच मे रोजी पहिल्यांदा मतदान करणार आहेत. प्रदीर्घ काळानंतर मतदानाचा अधिकार मिळाल्याने या मतदारांत अमाप उत्साह आहे. गेल्या वर्षी बांगलादेशासोबत वस्त्यांची देवाणघेवाण झाल्यानंतर या लोकांच्या वस्त्यांना औपचारिकरीत्या भारतीय क्षेत्र घोषित करण्यात आले. तोपर्यंत या लोकांना मतदानासह नागरिकत्वाचे कोणतेही अधिकार नव्हते. या वस्त्यांतील १५ हजार लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले असून यातील ९,७७६ लोक पात्र मतदार असून ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत. नोकऱ्यांत आरक्षण आणि जमीन कराराची त्वरित अंमलबजावणी ही या मतदारांसमोरील दोन प्रमुख आव्हाने आहेत. या वस्त्यातील लोकांना सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण हवे आहे. याशिवाय वस्त्यांतील सर्व विकासकामे तेथील रहिवाशांच्या भागीदारीतून केली जावीत, अशी त्यांची इच्छा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)बांगलादेश व भारताने एक आॅगस्टच्या मध्यरात्री १६२ वस्त्यांची देवाण-घेवाण केली होती. त्याद्वारे जगातील सर्वात गुंतागुंतीच्या सीमावादापैकी एका वादाचा अंत झाला होता. या प्रक्रियेत 17,160 एकर परिसरातील भारताच्या एकूण १११ वस्त्या बांगलादेशच्या क्षेत्रात तर ७११० एकरमधील बांगलादेशच्या ५१ वस्त्या भारतात समाविष्ट झाल्या. या वस्त्यांतील एक रहिवासी जैनल आबेदिन म्हणाला की, सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. आबेदिन म्हणाला की, वस्त्यांतील रस्ते, इमारती, रुग्णालये आणि शाळांच्या बांधकामाचे ठेके स्थानिक नागरिकांना दिले जावेत. पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाल्याबाबत तुझ्या काय भावना आहेत, असे विचारले असता आबेदिन म्हणाला की, आम्ही निवडणुका पाहिल्या आहेत. परंतु, त्यात कधी भाग घेतला नाही. मजेची गोष्ट म्हणजे आमच्या कुटुंबातील तीन पिढ्या मतदान करणार आहेत.वस्त्यांच्या देवाण-घेवाणीस आठ महिने उलटल्यानंतरही आपण भारताचे नागरिक असल्याबाबतची कागदपत्रे न मिळाल्याचे २० वर्षांच्या अजीबुरला दु:ख आहे. अजीबुरने फोनवर सांगितले की आम्हाला मतदान ओळखपत्र मिळाले आहे, परंतु, जमिनीची कागदपत्रे मिळालेली नाहीत.
‘ते’ करणार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मतदान
By admin | Published: May 04, 2016 2:03 AM