लखनौ - उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात 2017 मध्ये योगी आदित्यनाथ सत्येत आल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने “फिडबॅक” घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) बीएल संतोष यांनी सोमवारी लखनौ येथे मंत्री आणि पक्षाच्या नेत्याची प्रत्यक्ष बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतही त्यांच्या निवासस्थानी बौठक केली.
सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेचा सामना करण्याच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सातत्याने प्रश्न उभे राहत आहे. अशातच पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संतोष यांनी राज्याचा दौरा केला आहे. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांनी नेतृत्वासंदर्भात सार्वजनिकपणे वक्तव्यही केले होते. याशिवाय नुकत्याच झालेल्या पंचायतींच्या निवडणुकीतही पक्षाचे प्रदर्शन खराब राहिले. येथे पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायतींच्या निवडणुकीला महत्व आहे. एवढेच नाही, तर राज्यात मंत्रीमंडळामध्ये फेरबदल केला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यांनी नेत्यांसोबत विविध विभागांचे कामकाज, कोरोना काळातील कार्य, समस्या आणि पक्ष जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वापरले जाणारे धोरण, यांवर त्यांचे मत मागवले. तसेच त्यांना, भाजप आणि सरकारमधील समन्वयाच्या आभावाबरोबरच पक्षाचे नेते आणि पक्षातील नेत्यांची कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यासंदर्भात असमर्थता यासंदर्भातही माहिती मिळाली होती, असेही समजते.
संतोष यांनी आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह, वैद्यकीय शिक्षण आणि अर्थमंत्री सुरेश खन्ना आणि कायदामंत्री बृजेश पाठक यांच्यासह जवळपास सात मंत्र्यांशी चर्चा केली. बृजेश पाठक हे कोरोना व्यवस्थापनासंदर्भात चिंता व्यक्त करणारे पहिले व्यक्ती होते.
या बैठकीला भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी राधा मोहन सिंह, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि संघटन प्रदेश प्रभारी महासचिव सुनील बंसलदेखील उपस्थित होते. संतोष हे मंगळवारी उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासह सरकारमधील इतर मंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठका म्हणजे भाजपकडून नेत्यांना आपले विचार ठेवण्यासाठी दिलेले एक खुले व्यासपीठ आहे. त्यांना शांत करण्याचा एक प्रयत्न आहे. एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, ‘पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक बैठका होत होत्या, मात्र, यावेळी संघटनेचे नेते थेट फिडबॅक घेत आहेत आणि संघटना आणि सरकारमध्ये समन्वयाचे काही मुद्दे होते, जे नेत्यांकडून सातत्याने उचलले जात आहेत. यांवर बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली.