...तर ईशान्य भारतात फक्त एका राज्यात राहिल काँग्रेसचे सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 01:40 PM2018-02-28T13:40:20+5:302018-02-28T13:40:20+5:30
उत्तरेपाठोपाठ ईशान्य भारतातही भाजपाचा मोठा विस्तार होण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत. या दोन्ही राज्यात अन्य पक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये काल विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. उत्तरेपाठोपाठ ईशान्य भारतातही भाजपाचा मोठा विस्तार होण्याचे संकेत या एक्झिट पोलने दिले आहेत. त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यात भाजपा आघाडीला सत्ता मिळण्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये भाजपाला संधी नसली तरी तिथे काँग्रेसचे सरकार येणार नाही, ही भाजपासाठी जमेची बाजू आहे.
मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती राहू शकते. माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए.संगमा यांनी स्थापन केलेला एनपीपी सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. त्रिपुरा, नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभेत सध्या भाजपाची ताकत नगण्य आहे. या दोन्ही राज्यात अन्य पक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये भाजपा डाव्यांचे संस्थान खालसा करण्याची शक्यता आहे. मागच्या 25 वर्षांपासून त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता आहे.
तीनपैकी दोन एक्झिट पोल्सनी त्रिपुरामध्ये भाजपा-आयपीएफटी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तिसऱ्या एक्झिट पोलने अटीतटीचा सामना होईल असे म्हटले आहे. नागालँडमध्ये भाजपा माजी मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या एनडीपीपी पक्षाबरोबर आघाडी करुन निवडणूक लढवत आहे.
नागालँडमध्ये काँग्रेसला स्वत:चे अस्तित्व दाखवता आलेले नाही. सध्या इथे एनपीएफचे सरकार आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार निकाल लागले तर पहिल्यांदाच संपूर्ण ईशान्य भारतात फक्त मिझोराम या एका राज्यात काँग्रेसचे सरकार राहिल.