देशात प्रथमच सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार उज्ज्वल निकम यांच्या रुपाने बहुमान : २८ वर्षांत एकाही आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2016 10:19 PM
जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे.
जळगाव : यंदाच्या पद्म पुरस्कारची घोषणा झाली आणि एक वेगळी नोंद या वेळी झाली, ती म्हणजे सरकारी वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच डॉ. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या रुपाने वकिलाला पद्म पुरस्कार मिळाला. त्यात महाराष्ट्रातील वकिलाला हा बहुमान मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण खान्देशवासीयांना त्याचा अभिमान वाटत आहे. जळगावच्या केळीने देशभरात येथील ओळख तर निर्माण केलीच, त्यानंतर कायद्यावर श्रद्धा ठेऊन दहशतवादी, गुन्हेगार यांना त्यांची जागा दाखवून अल्पावधीत या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणार्या डॉ. ॲड. उज्ज्वल देवराम निकम यांनी जळगावला एका उंचीवर नेऊन ठेवले. अशा व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळाल्याने जळगावकरांचा उर प्रथम भरुन आला. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यापासून ते अगदी आताच्या अमरावती येथील दीपाली कुलकर्णी खून खटल्या सारखे संवेदनशील खटले हाताळून त्यांनी देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या व्यक्तीमत्वाचा हा अल्प परिचय....जळगाव शहरातील रामदास कॉलनी भागात राहणारे ॲड. उज्ज्वल निकम हे १९८७ पासून सरकारी वकील म्हणून कार्यरत असून महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा सरकारी वकील होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. गेल्या २८ वर्षांपासून ते सरकरी वकील म्हणून काम पाहत आहे. ॲड. निकम यांनी सरकारतर्फे चालविलेल्या विविध खटल्यांमध्ये एकूण ६३० आरोपींना जन्मठेपेची तर ३८ आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. १९९५ ते २००० या कालावधीत ते जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कायदा शाखेचे अधिष्ठाता (डीन) राहिलेले असून याच विद्यापीठात पाच वर्षे सिनेटर (सर्वोच्च नियामक मंडळ), २००१ ते २००४ दरम्यान ते युनियन बँक ऑफ इंडियाचे संचालक राहिले. २००१ ते २००३ दरम्यान आयुर्विमा महामंडळाच्या ॲडव्हायझरी बोर्डचे सदस्य होते. १६ वर्षे तुरुंगात...ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपल्या आयुष्यातील १६ वर्षे तुरुंगात काढली आहे, असे म्हटले तर सर्वांना धक्का बसेल. मात्र हे खरे आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी ते १४ वर्षे तर मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील पाक अतिरेकी अजमल कसाब याच्या खटल्यामध्ये ते दोन वर्षे तुरुंगात होते. कारण हे दोनही खटले तुरुंगात चालले, त्यामुळे त्यांची १६ वर्षे तुरुंगात गेली.