नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचे संकट संपलेले नाही. त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल व सणासुदींच्या उत्साहावर पाणी पडेल, असा इशारा यावेळी मोदींनी दिला. लॉकडाउन संपला असला तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, अद्यापही कोरोनाचं संकट गंभीर असून लस येईपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. तर, दुसरीकडे लस उपलब्ध झाल्यानंतरही सर्वप्रथम कोणाला देणार, यासाठी एसओपी ठरविण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात कोरोनाची लस विकसीत उपलब्ध झाल्यास त्याचे वाटप किंवा प्राधान्यक्रमाने ती नागरिकांपर्यंत कशारितीने पोहोचवता येईल, याची प्रणाली तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील 3 कोटी नागरिकांना प्राधान्य क्रमाने ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये, 70 ते 80 लाख डॉक्टर्स आहेत. तर, जवळपास 2 कोटी नागरिक वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असणार आहेत. जर, देशात लस निर्माण झली, तर प्राधान्याने याच नागरिकांना ही लस देण्यात येईल. एक तज्ज्ञांच्या समितीने एक आराखडा तयार केला असून प्राधान्यक्रमाने लस कोणाल देण्यात येईल, हे त्यामध्ये ठरवले आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना योद्धा बनून फिल्डवर काम करणाऱ्या नागरिकांना ही लस देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. केंद्राने ज्या 2 कोटी नागरिकांना प्राधान्यक्रमाने लस देण्याचे ठरवले आहे, त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सैन्य दल, वैद्यकीय कर्मचारी, आशा वर्कर, सफाई कर्मचारी, शिक्षक आणि ड्रायव्हर यांचा समावेश आहे. पुढील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत कोरोनाची व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकेल, असे आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्राथमिकता अहवाल तयार करण्यात येत आहे.