नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन व्ही रामणा यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश म्हणून तीन महिला न्यायाधीशांसह नऊ नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच नऊ न्यायाधीशांनी एकाचवेळी शपथ घेतली. शपथविधीचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या भवनात उभारण्यात आलेल्या सभागृहात पार पडला.
परंपरेनुसार, नवीन न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीशांच्या न्यायालयीन कक्षात पदाची शपथ दिली जाते. मंगळवारी नऊ नवीन न्यायाधीशांनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह एकूण ३४ न्यायाधीश असू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतलेल्या नऊ नवीन न्यायाधीशांमध्ये न्यायाधीश अभय श्रीनिवास ओका (जे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते), न्यायाधीश विक्रम नाथ (जे गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते), न्यायाधीश जितेंद्र कुमार महेश्वरी (जे सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते), न्यायाधीश हिमा कोहली (ज्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या) आणि न्यायाधीश बी व्ही नागरत्ना (ज्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होत्या) यांचा समावेश आहे.
याचबरोबर, न्यायाधीश सीटी. रविकुमार (जे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते), न्यायाधीश एमएम सुंदरेश (जे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते), न्यायाधीश बेला एम त्रिवेदी (ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या) आणि पी.एस. नरसिंह (वरिष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल) यांनीही शपथ घेतली.
न्यायाधीश नागरत्ना २०२७ मध्ये बनू शकतात पहिल्या महिला सरन्यायाधीशन्यायाधीश बी व्ही नागरत्ना या सप्टेंबर २०२७ मध्ये भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनण्याच्या रांगेत आहेत. न्यायाधीश नागरत्ना यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६२ रोजी झाला आणि त्या माजी न्यायाधीश ई.एस. वेंकटरामय्या यांच्या कन्या आहेत. आज शपथ घेतलेल्या नऊ नवीन न्यायाधीशांपैकी न्यायाधीश विक्रम नाथ, न्यायाधीश नागरत्ना आणि न्यायाधीश पी.एस हे सरन्यायाधीश होण्याच्या रांगेत आहेत.