ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आंदोलनादरम्यान चीनचे झेंडे फडकवण्यात आल्याचे निर्दशनास आले. शुक्रवारी (14 ऑक्टोबर) नमाज झाल्यानंतर बारामुल्ला परिसरात आंदोलनकर्त्यांनी चीनचे झेंडे फडकवल्याची माहिती मिळत आहे. काश्मीर खो-यात पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचे अनेकदा दिसून आले आहे, मात्र चीनचे झेंडे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच फडकवल्याची बाब समोर येत आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात असून ही बाब तितकीच गंभीर असून भारतासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नमाज संपल्यानंतर काही जणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावेळी काही जणांनी चीनचा झेंडा हातात घेत, 'आम्हाला चीनकडून मदत हवी आहे', अशी घोषणाबाजी करत निदर्शन करायला सुरुवात केली. यावेळी जवळपास पाच ते सहा चीनचे झेंडे आंदोलनकर्त्यांच्या हातात पाहायला मिळाले. हे झेंडे फडकवणा-या सर्वांचे चेहरे झाकलेले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेसाठी भारतात दाखल होणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही संवाद साधणार आहेत. शी जिनपिंग यांच्या या दौ-याच्या पार्श्वभूमीवरच चीनचे झेंडे काश्मीर खो-यात फडकवण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहानी वनीचा खात्मा केल्यापासून काश्मीर खोरे धुमसत आहे. तेव्हापासून खो-यात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे अनेकांचा बळी गेला आहे, तर कित्येक जण जखमी झाले आहे. यामध्ये पोलिसांचादेखील समावेश आहे.