नवी दिल्ली : नेताजींच्या आझाद हिंद सेनेने दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवत इंग्रजांच्या नाकीनऊ आणले होते. मात्र, जपानवरील अणुबॉम्बहल्ल्यामुळे या सेनेची वाताहात झाली होती. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूमुळे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना कोणीच वाली राहिला नव्हता. त्यांची ही अवस्था देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही सुरुच राहिली होती. मात्र, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हयात असलेल्या चार सैनिकांना राजपथावर पथसंचनात सहभागी होण्याचा मान मिळाला.
आझाद हिंद सेनेच्या या सैनिकांचे वय नव्वदी पार केलेले आहे. चंदीगढचे लालतीराम (98),गुरुग्रामचे परमानंद (99), हीरा सिंह (97) आणि भागमल (95) या सैनिकांनी आज परेडमध्ये सहभाग घेतला. आईएनएच्या सैनिकांना पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बोलावण्यात आले होते.