AIIMS Anurag Maloo Story : गिर्यारोहक अनुरागची पॅशन, त्याचे धाडस आणि डॉक्टरांच्या मेहनतीची कहाणी सध्या प्रचंड चर्चिली जात आहे. ८० मीटर खोल बर्फाच्या खड्ड्यात पडलेला अनुराग ७२ तास तिथेच होता. सुमारे २०० दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला. सात शस्त्रक्रिया झाल्या. अखेर मृत्यूशी झुंज देत, काळाच्या हल्ल्यावर मात करत अनुराग पुन्हा उभा राहिला. नऊ नंबरच्या बेडवर पडलेल्या अनुरागने पुन्हा जमिनीवर पाय ठेवला आणि स्वत:च्या बळावर पुढे पाऊल टाकले. तो म्हणाला की, मी आयुष्यात पुन्हा उभे राहण्याचा विचारही केला नव्हता, पण इथे आल्यानंतर मला समजले की एम्स हे एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही आणि इथले डॉक्टर हे देवापेक्षा कमी नाहीत.
नक्की काय घडलं?
अनुराग मालू नेपाळच्या अन्नपूर्णा पर्वतावर चढाई करत होता. यावर्षी १७ एप्रिलला त्याचा अपघात झाला. ८० मीटर खोल बर्फाच्या खड्ड्यात ७२ तास तो अडकून राहिला. तो तेथे अडकला असल्याचे एका पोलिश गिर्यारोहकाला समजले. त्याला बाहेर काढल्यानंतर आधी बेस कॅम्प आणि नंतर पोखरा आणि नंतर काठमांडूला नेण्यात आले. तेथे अनुरागवर २० दिवस उपचार सुरू होते.
'एम्स'मधील अशी पहिलीच घटना
एम्सच्या बर्न आणि प्लास्टिक सर्जरी विभागाचे एचओडी डॉ मनीष सिंघल यांनी सांगितले की, त्यांना ५ मे रोजी फोन आला होता. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना फोन केला होता आणि आशा सोडून दिल्या होत्या. १३ जुलै रोजी त्याला आमच्या केंद्रात म्हणजेच एम्समध्ये दाखल करण्यात आले. १७४ दिवस एम्समध्ये उपचार करण्यात आले. या काळात त्याच्यावर सात शस्त्रक्रिया झाल्या आणि आता त्याला नवीन जीवन मिळाल्याने तो आनंदी आहे. डॉक्टर म्हणाले की, एम्समध्येही अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, जेव्हा रुग्णावर इतका वेळ उपचार सुरू आहेत.
आईस बर्नचा बळी ठरलेला होता अनुराग!
डॉ. मनीष यांनी सांगितले की, उणे ३० अंश तापमानामुळे तो आईस बर्नचा बळी ठरला होता. शरीराची उजवी बाजू पूर्णपणे जळाली होती. त्वचा निघून गेली होती. जेव्हा त्याला आणण्यात आले तेव्हा त्यावा पाहणारे पहिले व्यक्ती होते ICU चे प्रभारी डॉ कपिल सोनी. त्याची किडनी निकामी झाली होती. तो डायलिसिसवर होता. छातीत संसर्ग झाला होता. बीपी लो होते. सुरुवातीचे काही दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले होते. पहिल्या शस्त्रक्रियेत आईस बर्नची जागा म्हणजेच फ्रॉस्ट बाईट कापून काढून टाकण्यात आली. संसर्ग इतका गंभीर होता की त्याचे वजन ६५ किलोवरून ४२ किलोवर आले. तो ४४ दिवस आयसीयूमध्ये राहिला आणि ९ विभागातील तज्ज्ञांनी एकत्रितपणे त्याच्यावर उपचार केले. स्किन ग्राफ्टिंग केले. शव देणगीतून संवर्धन केलेली त्वचा त्याच्यावर रोपण करण्यात आली. नंतर सुधारणा झाली आणि आता तो आपल्या पायांवर उभा आहे.