नवी दिल्ली – भारतात पहिल्यांदाच एक उड्डाणपूल अवघ्या २० दिवसांत बनवण्याचा विक्रम नोंदवण्यात येणार आहे. गुजरातच्या वलसाड येथे हा पूल बनवण्यात येत आहे. आतापर्यंत या उड्डाणपूलाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं आहे. येत्या २२ जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुली करणार असल्याचा विश्वास कंपनीने नोंदवला आहे. या प्रकल्पासाठी साडे चार कोटी रुपये खर्च आला आहे.
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर(WDFC) चे मुख्य जनरल मेनेजर श्याम सिंह म्हणाले की, गेल्या २ जूनपासून या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं. आतापर्यंत एका आठवड्यात या उड्डाणपुलाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं आहे. २० दिवसांत हा पूल आम्ही तयार करू असा आम्हाला विश्वास आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी सरकारने २० दिवस वाहतूक थांबवण्याची परवानगी दिली होती असं कंपनीने म्हटलं.
किमान १०० दिवसांचा कालावधी
अशाप्रकारे उड्डाणपूलाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नॉन स्टॉप काम केले तरीही १०० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु हा रस्ता वलसाड पूर्व आणि वलसाड पश्चिमेला जोडतो. अशा स्थितीत १०० दिवस याठिकाणी वाहतूक रोखून धरणं हे अशक्य होतं. अशावेळी प्राधिकरणानं पहिल्यांदाच पूलाचे काही भाग तयार करून ते जोडून पूल बनवण्याची योजना आखली. उड्डाणपुलाचे भाग जोडण्यासाठी ४ हेव्ही ड्यूटी हायड्रॉलिक क्रेन वापरण्यात आल्या होत्या. त्यांची क्षमता ३०० मेट्रीक टन ते ५०० मेट्रीक टन इतकी होती. या पुलाचं बांधकाम वेगानं व्हावं हा निर्णयही कोरोना महामारीच्या संकटात घेतला गेला. कारण पश्चिमी डीएफसीच्या वैतरणा आणि सचिन खंडाच्या कामावर याचा परिणाम होत होता.