अहमदाबाद, दि. 13 - जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या दोन दिवसीय भारत दौ-याला आजपासून सुरुवात होत आहे. अबे आणि मोदी अहमदाबादच्या रोड शो दरम्यान ऐतिहासिक सिदी सय्यद मशिदीला भेट देणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना मोदींनी मुस्लिम टोपी डोक्यावर घालायला नकार दिला होता. तेच मोदी आता मशिदीमध्ये जाणार आहेत. त्यामुळे बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. दोन्ही नेते ज्या सिदी सय्यद मशिदीला भेट देणार आहेत त्याविषयी जाणून घेऊया.
- मोदी आणि अबे येणार असल्याने या मशिदीची सुंदर सजावट करण्यात आली आहे.
- 16 व्या शतकात बांधण्यात आलेली ही मशीद जाळीदार नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे.
- सिदी सय्यद मशीद अहमदाबादमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजली जाते. अबे मशिदीत दाखल झाल्यानंतर मशिदीमध्ये पंतप्रधान मोदी गाइडची भूमिका बजावतील.
- दोन देशांचे राष्ट्रप्रमुख मशिदीत येणार असल्याने या मशिदीच्या सजावटीवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. मशिदीचे सौदर्य उठून दिसावे यासाठी मशिदीच्या अधिका-यांसह अहमदाबादचे महापालिका आयुक्त आणि पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनीही मेहनत घेतली आहे.
- 1572 मध्ये शमसुद्दीन मुजफ्फर शाहच्या शासनकाळात मशिदीचे बांधकाम सुरु झाले.
- मुजफ्फर शाह गुजरातचा शेवटचा सुल्तान होता.
- 1573 साली ही मशीद बांधून पूर्ण झाली. त्यावेळी मुगल बादशाह अकबरने गुजरातवर विजय मिळवला होता.
- या मशिदीची जाळीदार नक्षीची डिझाईन जगभरात प्रसिद्ध आहे. सिदी सय्यदची जाळी म्हणूनही ही मशीद ओळखली जाते.
- सूर्यास्ताच्यावेळी मोदी आणि अबे मशिदीत दाखल होतील.
- संध्याकाळी मावळत्या सुर्याची किरणे जेव्हा मशिदीच्या जाळीदार नक्षीवर पडतात ते दृश्य अदभूत असते. डोळयात साठवून ठेवण्याचा हा प्रसंग असते. ही वेळ खास अबे आणि मोदी यांच्या फोटोसेशनसाठी राखून ठेवण्यात आली आहे.