नवी दिल्ली : पॅरिसमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विदेशात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, संकटाच्या परिस्थितीत त्यांना बाहेर काढण्यासाठी खास योजना तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर प्रमुख यांनी शनिवारीच या योजनेला मूर्त रूप दिले.मोदी सध्या जी-२० परिषदेसाठी तुर्की भेटीवर असून राजधानी अंकारा येथे १० आॅक्टोबर रोजी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये १०२ जण ठार झाल्यामुळे हे शहरही असुरक्षित मानले जाते. पॅरिसमध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्यांनी संपूर्ण जग हादरले असताना भारतीय सुरक्षा संस्थांनाही मोदींच्या सुरक्षेबाबत अचानक नवी आकस्मिक योजना तयार करणे भाग पडले आहे. मोसाद आणि ब्रिटिश गुप्तचर सेवा एमआय ५ या विदेशी सुरक्षारक्षकांचा समावेश असलेले खास सुरक्षा पथक मोदींच्या सुरक्षा ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे. अंकारा आणि जी-२० परिषद होत असलेल्या अंताल्या येथे मोदींसोबत हे पथक राहील.मोदींच्या सुरक्षेत विशेष सुरक्षा गट, गुप्तचरांचा समावेश असून, त्याखेरीज तुर्की आणि लगतच्या स्थानिक एजंटचीही मदत घेतली जात असल्याचे समजते. सामूहिक गोळीबार किंवा कार्यक्रमस्थळी हवाई हल्ले होण्याची शक्यता पाहता मोदींना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खास योजना असेल. रॉ आणि आयबीकडून सतर्कतातुर्कीमधील प्रतिकूल परिस्थिती पाहता एमआय ५ तसेच अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेची योजना आखताना मदत घेण्यात आली आहे. रॉ आणि आयबीच्या विदेशी शाखांनी मोदी भेट देणार असलेले कार्यक्रम स्थळ तसेच हॉटेलची कसून तपासणी केली आहे. येथील शिखर परिषदेच्या स्थळी उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी स्पेशल कमांड सेंटरच्या माध्यमातून सर्व रक्षक संपर्कात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.
मोदींच्या सुरक्षेला प्रथमच मोसाद आणि एमआय ५
By admin | Published: November 16, 2015 12:12 AM