नवी दिल्ली - डोकलाममध्ये कायमस्वरुपी तळ उभारण्याचे चीनने जवळपास निश्चित केले आहे. डोकलाममध्ये सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळच्या भागात चीनचे 1600 ते 1800 सैनिक तैनात आहेत. चीनकडून इथे कायमस्वरुपी तळ उभारण्याची तयारी सुरु आहे. कडाक्याच्या थंडीत सैन्याला टिकून राहाता यावे यासाठी चीनकडून इथे दोन हॅलिपॅड, रस्ते, तंबू आणि स्टोअर्स रुम बांधण्याचे काम सुरु आहे.
डोकलामच्या दक्षिणेला जामफेरीपर्यंत रस्ता विस्तार करण्यापासून चीनला रोखण्याचे भारताचे रणनितीक उद्दिष्टय होते. त्यात आपण यशस्वी ठरलो असे भारतीय संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले. याआधी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त डोकलाम प्रदेशावर आपला हक्क सांगण्यासाठी एप्रिल-मे आणि ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात चिनी सैन्य इथे गस्त घालायचे. आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी चिनी सैन्य या भागात यायचे असे सूत्रांनी सांगितले.
यावर्षी 73 दिवस डोकलामध्ये भारत आणि चीनचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते. दोन्ही देशातील राजनैतिक अधिका-यांनी कुटनितीक तोडगा काढल्यानंतर 28 ऑगस्टला दोन्ही देशांचे सैन्य मागे फिरले. यंदाच्या हिवाळयात प्रथमच चिनी सैन्याने डोकलाममध्ये तळ ठोकला आहे. भारत आणि चीनचे सैन्य ज्या भागात समोरासमोर आले होते तिथे कुठलीही संघर्षाची स्थिती नाही. चीनला डोकलाममध्ये रस्ता बांधणीचे काम करु दिले असते तर भारताचा महत्वाचा भूभाग थेट चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता. त्यामुळे भारताने तीव्र आक्षेप घेत रस्ता बांधणीचे काम रोखून धरले. वादग्रस्त भागात चीन वारंवार कुरघोडीचा प्रयत्न करेल असे भाकीत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सप्टेंबर महिन्यात केले होते. ते खरे ठरताना दिसतयं. रणनितीक वर्चस्व मिळवण्यासाठी डोकलामचा भाग बळकावण्याचा चीनचा इरादा आहे. ट्रायजंक्शन परिसरात भारतीय सैन्यही मोक्याच्या ठिकाणांवर तैनात आहे.
डोकलामपासून जवळच चीनने बांधली 400 मीटर उंचीची भिंतडोकलाममधल्या वादग्रस्त भागातून माघार घेऊन चिनी सैन्य 400 मीटर आत गेले असले तरी चीन अजिबात गप्प बसलेला नाही. डोकलामपासून जवळच जिथे चिनी सैनिकांनी तळ ठोकलाय तिथे मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे. झी न्यूजने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार डोकलाममधल्या वादग्रस्त भागाच्या मागच्या बाजूला चीनने 400 मीटर उंचीची भिंत उभारली आहे. आपण काय करतोय याची कुणालाही खबर लागू नये यासाठी चीनने ही भिंत बांधली आहे.
चीनकडून या भागात मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे तसेच मोठया संख्येने चिनी सैनिक इथे तैनात करण्यात आले आहेत. सैनिकांना सामावून घेण्यासाठी 16 बराक बांधण्यात आले आहेत. सहा बोगदे बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या 23 ते 27 शेडस असून 200 पेक्षा जास्त तंबू ठोकण्यात आले आहेत.