First Vande Bharat Metro Run: वंदे भारत ट्रेनच्या अनेक सेवा देशभरात सुरू आहेत. त्यात नवनवीन सेवांची भर पडत आहे. वंदे भारत ट्रेनच्या यशस्वीतेनंतर वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनच्या प्रोटोटाइप मॉडेलचे रेल्वेमंत्र्यांनी अनावरण केले. अवघ्या काही महिन्यात पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यातच आता वंदे भारत मेट्रो लवकरच सुरू केली जात आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन देशाच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे. याचा पहिली मान गुजरातला मिळाल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वंदे भारत मेट्रो ताशी १३० किमी वेगाने जाऊ शकते. परंतु, मार्गांनुसार आणि मार्गांच्या क्षमतेनुसार वंदे भारत मेट्रो ट्रेन ७५ ते ९० किमी प्रति तास वेगाने चालवली जाणार आहे. या ट्रेनमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत मेट्रोही वेगाने पिकअप घेणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने ब्रेक घेत थांबवताही येणार आहे. देशातील पॅसेंजर ट्रेनपेक्षा या वंदे भारत मेट्रोचा वेग अधिक असणार आहे. तसेच देशभरात ३ हजार वंदे भारत मेट्रो सेवा सुरू करण्याचा मानस भारतीय रेल्वेचा आहे.
पहिला मान गुजरातला! ‘या’ मार्गावर सेवा होणार सुरू
पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भातील वेळापत्रक जारी केले आहे. पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन भुज ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. ही रेल्वे आठवड्यातून ६ दिवस चालवली जाणार आहे. १६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भुज ते अहमदाबाद पहिली वंदे भारत मेट्रो अंजार, गांधीधाम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमतीला या स्थानकांवर थांबेल. तर अहमदाबादहून निघालेली पहिली वंदे भारत मेट्रो साबरमती, चांदलोडिया, विरमगाम, ध्रांगध्रा, हलवद, समखियाली, भचाऊ, गांधीधाम अंजार मार्गे भुजला पोहोचेल.
पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे वेळापत्रक
पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन भुज स्थानकावरून सकाळी ५ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल. ६ तास ४५ मिनिटांत सुमारे ३६० किमीचे अंतर कापून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन अहमदाबादहून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी भुजला पोहोचेल.
पहिल्या वंदे भारत मेट्रोची वैशिष्ट्ये काय असतील?
वंदे मेट्रो ट्रेन ही वंदे भारत ट्रेनसारखीच असेल. परंतु उपनगरीय मेट्रो प्रणालीची वैशिष्ट्ये आणि सोयी सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला इंजिन तसेच स्वयंचलित दरवाजे असतील. पहिली वंदे भारत मेट्रो १० डब्यांची असणार आहे. वंदे भारत आणि वंदे मेट्रोमधील मुख्य फरक हा आहे की, ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित असेल. प्रवासी ही ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी काउंटरवर तिकीट खरेदी करू शकतात. वंदे भारत मेट्रो ट्रेनचे रेक रेल्वे मंत्रालयाच्या चेन्नईयेथील आयसीएफमध्ये बनवले आहेत.
पहिल्या वंदे भारत मेट्रोचे तिकीट दर किती असतील?
पहिल्या वंदे भारत मेट्रो तिकिटाचा कमीत कमी दर ३० रुपये असेल. ५० किलोमीटरच्या प्रवासाला ६० रुपये इतके शुल्क लागेल. वंदे भारत मेट्रो ट्रेनमध्ये मासिक पास वैध असेल. साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी केलेले तिकीट चालणार नाही. यासाठी वेगळे एमएसटी तिकीट जारी केले जाईल. साप्ताहिक, मासिक तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांना सात दिवस, १५ दिवस, २० दिवसांच्या एकेरी प्रवासाचे शुल्क भरावे लागेल.
दरम्यान, अहमदाबाद विभागाने अद्याप अधिकृतपणे तिकीट दर जाहीर केले नसले तरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतांनुसार, भुज ते अहमदाबाद या एकेरी प्रवासाचे मूळ भाडे, जीएसटी वगळून, अंदाजे ४३० रुपये असू शकेल.