बंगळुरू/मुंबई - कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. डीके शिवकुमार यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने यंदाची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने घोडेबाजार किंवा आमदारांची पळवापळवी असले उद्योग टळल्याची चर्चा होत आहे. काँग्रेसने १३५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले असून आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपला येथील निवडणुकीत केवळ ६६ जागा जिंकता आल्या आहेत. तर, जनता दल सेक्युलर पक्षाला १९ जागांवरच समाधान मानावे लागले. दरम्यान, येथील जया नगर मतदारसंघात रात्रभर मतमोजणीवरुन गोंधळ उडाला होता.
काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता काबिज केली. मात्र, येथील जया नगर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीनंतर मतमोजणीवरुन रात्रभर गोंधळ पाहायला मिळाला. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांचा १६० मतांनी विजय झाल्याचे सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. मात्र, भाजप नेत्यांनी दुसऱ्यांदा मतमोजणी करण्याची मागणी केल्यामुळे गोंधळ उडाला. त्यावेळी, भाजपचे तेजस्वी सूर्या आणि भाजप उमेदवार राममूर्ती यांनी दुसऱ्यांदा मतमोजणीचा आग्रह धरला. त्याला, काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांनी विरोध केला. त्यादरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार मतदारसंघात पोहोचले, त्यांनी तेथे धरणे आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, आयोगाने दुसऱ्यांदा मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला.
निवडणूक आयोगाने जया नगर मतदारसंघात दुसऱ्यांदा मतमोजणी केली. त्यावेळी, भाजप उमेदवार राममूर्ती यांचा १६ मतांनी विजय झाला. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आधी पराभव आणि नंतर विजय झाल्याने भाजपला अत्यानंद झाला. तर, काँग्रेसच्या रेड्डी यांना पराभवाचे मोठे दु:ख पचवावे लागले. मात्र, काँग्रेसच्या रामलिंगा रेड्डी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांची राममूर्ती यांच्यासोबत मिलीभगत झाली, त्यांनीच त्यांना लाभ मिळवून दिला, असा गंभीर आरोप सौम्या रेड्डी यांचे वडील रामलिंगा यांनी केला. मात्र, येथील मतदारसंघात भाजपचे राममूर्ती यांचा १६ मतांनी विजय घोषित करण्यात आला आहे.