ऑनलाइन लोकमत
कोळीकोड, दि. 24 - आशियातील सर्व देश २१ वे शतक आशियाचं व्हावं यासाठी प्रयत्न करत असताना एक देश मात्र २१ वे शतक आशियाचं होऊ नये, संपुर्ण आशियात रक्तपात व्हावा, दहशतवादाचं सावट राहावं, निर्दोष लोकांना मारलं जावं यासाठी षडयंत्र रचण्यात व्यस्त आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोझीकोडे येथील जाहीर सभेत पाकिस्तावर प्रहार केला. उरी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत कडाडून टीका केली. केरळमध्ये ही सभा पार पडली.
उरी हल्ला विसरणार नाही -
उरी दहशतवादी हल्ल्यात जे १८ जवान शहीद झाले, त्यांच बलिदान भारत विसरणार नाही असं सांगत मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशाराच देऊन टाकला. दहशतवाद माणुसकीचा शत्रू आहे. सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा पराभव करणं गरजेचं आहे. भारत दहशतवादासमोर कधीच झुकला नाही आणि झुकणारही नाही. उरी हल्ल्यानंतर देशभरात आक्रोश आहे. हा देश उरी हल्ल्याला कधीच विसरणार नाही ही गोष्ट दहशतवाद्यांनी लक्षात ठेवावी असं सागंत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं.
जवानांचा अभिमान -
गेल्या काही महिन्यात 17 वेळा शेजारी देशाने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र शूर जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा खात्मा केला. 110 हून अधिक दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. जवानांनी देशाला वाचवण्याचं काम केलं असून आम्हाला आमच्या जवानांचा गर्व आहे. पण एकदाच शेजारी देश घुसखोरीत यशस्वी झाले आणि 18 जवान शहीद झाले, जर 17 वेळा ते यशस्वी झाले असते तर काय झालं असतं याची कल्पना आपण करु शकत नाही असं बोलताना नरेंद्र मोदींनी जवानांचं कौतुक केलं.
#WATCH PM Modi to Pak: Sacrifice of our 18 soldiers won't go in vain. Will intensify our efforts to isolate you completely, globally. pic.twitter.com/CJPp74Gl8V— ANI (@ANI_news) September 24, 2016
जवानांनी फक्त शस्त्र नव्हे तर नैतिक पाठिंब्याचीही गरज असते. देशभरातून त्यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांचा विजय होत आहे. शेजारच्या देशातील नेते एक हजार वर्ष लढण्याची भाषा करायचे पण काळानुसार कुठे गायब झाले कळतच नाही. पाकिस्तानमधील नेते दहशतवाद्यांनी लिहून दिलेलं भाषण वाचून काश्मीरचे गुणगान गात आहेत अशी टीका मोदींनी केली.
आधी घरचं सांभाळा -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तानच्या जनतेशी संवाद साधत '1947 च्या आधी तुमचे पुर्वज याच धर्तीच्या पाया पडत होते. पाकिस्तानव्याप्त काश्मीर तुमच्याकडे असूनदेखील तुमचे राज्यकर्ते सांभाळू शकत नाहीत. बलुचिस्तान, पख्तूनीदेखील सांभाळणं जमलं नसताना काश्मीरबद्दल बोलून तुम्हाला भरकटवत आहेत. जे घरात आहे ते तरी आधी सांभाळून दाखवा म्हणावं,' असं बोलले आहेत.
दोन्ही देश एकत्र स्वतंत्र झाले, पण भारत सॉफ्टवेअर आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना निर्यात करतो असं का ? हे जनतेने विचारावं असं आवाहन नरेंद्र मोदींनी पाकिस्तानी जनतेला केलं.
भारत युद्धासाठी तयार -
आमच्याशी लढण्याची भाषा करत असाल तर आम्ही आव्हान स्विकारायला तयार आहोत. भारत पाकिस्तानसोबत युद्धासाठी तयार आहे. दोन्ही देशांनी गरिबी, शिक्षण, बेरोजगारी यासाठी लढाई सुरु करुया मग पाहू कोणाचा विजय होतो असं मोदी बोलले आहेत.
पाकिस्तानला एकटं पाडणार -
आमच्या 18 जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. जगात तुम्हाला एकटं पाडण्यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. सोबतच तो दिवस लांब नाही जेव्हा पाकिस्तानमधील जनता दहशतावद आणि हुकूमशहांविरोधात उभे राहिल असंही बोलले आहेत.