बाळा काशीवार : साकोलीत मत्स्यबीज निर्मिती प्रशिक्षण साकोली : भंडारा या तलावाच्या जिल्ह्यात पाणी आहे. तरीही आम्ही मत्स्योत्पादनात मागे आहोत. याकरिता मत्स्यपालकांना तांत्रिक प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी केले.मत्स्य विभाग भंडारा द्वारा साकोली तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित बांध प्रजनन आढावा सभा व मत्स्यबीज निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आत्माच्या संचालिका प्रज्ञा गोळघाटे, मत्स्य विभागाचे आयुक्त देवघरे, मच्छीमार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पचारे, एनएफ डीसीचे सदस्य संजय केवट, आयुक्त श्री.के. पसारकर, जिल्हा बँकेचे संचालक वासुदेव तीरगारे, मत्स्य विकास अधिकारी अतुल वरगंटीवार, एच.आर. पाटील, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त मा.मा. चांदेवार उपस्थित होते. यावेळी आ.काशीवार म्हणाले, वैनगंगा नदीत गोसेखुर्द धरणापासून कारधा पुलापर्यंत प्रायोगिक तत्वावर कॅज कल्चर योजनेच्या माध्यमातून मत्स्योत्पादन करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतून बेरोजगारांना रोजगार मिळेल व मत्स्योत्पादनात वाढ होईल. शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिक विकास साधावा असे आवाहन केले. यावेळी प्रज्ञा गोळघाटे म्हणाल्या, जिल्ह्यात दहा मत्स्य संस्थांना दहा मोगराबांध तयार करून दिल्यामुळे मत्स्य बीज निर्मितीत भर पडणार आहे. देवघरे म्हणाले, नैसर्गिक पाण्यावर अवलंबून न राहता मोगराबांध पद्धतीचा वापर केल्यास मत्स्यबीज निर्मितीचे मोठे लक्ष गाठता येते. मत्स्योत्पादकांनी उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घेऊन आर्थिक प्रगती करण्याचे आव्हान देवघरे यांनी केले. प्रास्ताविकात चांदेवार म्हणाले, भंडारा जिल्ह्यात २० कोटी मत्स्यजीरे निर्मित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. याकरिता प्रोजेक्टरच्या माध्यमाने मत्स्यजीरे निर्मिती व मत्स्य संयोगनाचे प्रशिक्षण देण्यात आले. दहा मत्स्य संस्थांना मोगराबांध संच देण्यात आले आहेत. संचालन व्ही.के. पसारकर यांनी तर आभारप्रदर्शन एच.आर. पाटील यांनी केले. साकोली तालुक्यातील खंडाळा व सालई येथील मत्स्य संस्था व चरे मोठ्या प्रमाणात मत्स्यजीरे निर्मिती केल्याबद्दल संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील मत्स्योत्पादन सहकारी संस्थांचे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
मत्स्यपालकांना तांत्रिक प्रशिक्षण गरजेचे
By admin | Published: June 08, 2016 12:31 AM