अमेठी - भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर विजय मिळवला. मात्र या विजयानंतर स्मृती इराणींचे निकटवर्तीय आणि बरौलिया गावचे माजी सरपंच असलेल्या सुरेंद्र सिंह यांची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक करण्यात आली असून वसीम असं आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री वसीमला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तुलही जप्त केले आहे. वसीमने पोलिसांना पाहताच गोळीबार सुरू केला पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस आणि वसीम दोघेही जखमी झाले आहेत. तसेच हल्ल्यामागचा हा मास्टरमाईंड असल्याची माहिती मिळत आहे.
सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी तातडीने अमेठीकडे धाव घेतली होती. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. सुरेंद्र यांच्या पार्थिवाला खांदा देतानाच स्मृती इराणी यांनी आरोपींना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढू, असे सांगितले होते. दरम्यान, सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नसीम, धर्मनाथ गुप्ता आणि बी.डी.सी रामचंद्र यांना याआधी अटक केली आहे. तसेच या तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील दोन आरोपी वसीम आणि गोलू हे फरार होते. मात्र आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
सुरेंद्र सिंह हे घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना फायदा झाला होता.