नवी दिल्ली, दि. 22 - 1 एप्रिलपासून देशातील 5 बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. 1 एप्रिलपासून या पाच बँका स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक भाग असणार आहेत. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा या बँकांचा समावेश आहे. 1 एप्रिलपासून या सर्व बँकांच्या शाखा एसबीआयच्या ब्रँचच्या स्वरुपात काम करणार आहेत. तसेच भारतीय महिला बँकेचं सुद्धा एसबीआयमध्ये विलीनीकरण होणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय महिला बँकेचंही स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण केल्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत, असंही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सांगितलं आहे. या बँकांच्या विलीनीकरणामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी शक्तिशाली होणार असून, सर्वात मोठी बँक म्हणून समोर येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला या बँकांच्या विलीनीकरणामुळे 5000 कोटींचा फायदा होणार आहे. या विलीनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ 21 लाख कोटींहून अधिकच्या ठेवी असणार आहेत. तसेच कर्जपुरवठाही 17.5 लाखांच्या घरात जाणार आहे.गेल्या वर्षी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच महिलांनी बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रत्येक जिल्ह्यात बँकेची महिला शाखा सुरू केल्या होत्या. एसबीआयनं या बँकांमध्ये महिलांना कामकाज करणे सोयीचे होईल, अशा पद्धतीने या सर्व व्यवस्था ठेवली आहे. महिलांसाठी कामकाजासाठीच्या दृष्टीने सुरक्षित आणि योग्य वातावरण निर्माण करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत, असंही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य म्हणाला होत्या. आता भारतीय महिला बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण केल्यामुळे महिलांना त्याचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.
1 एप्रिलपासून 'या' पाच बँकांचं होणार SBIमध्ये विलीनीकरण
By admin | Published: March 22, 2017 12:37 PM