बुधवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण, बिहारच्या औरंगाबादमध्ये तलावात आंघोळ करताना बुडून पाच मुलांचा मृत्यू झाला अन् बहिणीनं आपल्या भाऊरायांना कायमचं गमावलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे देखील समोर आली आहेत. शुभम कुमार, नीरज कुमार, धीरज कुमार, प्रिन्स कुमार आणि अमित कुमार अशी मृतांची नावे आहेत.
गावात घडलेल्या घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मुलांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तलावात बुडून मृत्यूऔरंगाबाद जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी विजयंत यांनी सांगितले की, सर्व मुले गावापासून काही अंतरावर असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेली होती. आंघोळ करत असताना ही मुले चुकून खोल पाण्यात गेली आणि तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राखी बांधल्यानंतर सर्व मुले तलावात आंघोळीसाठी गेली होती.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतदरम्यान, तलावात मुले बुडाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तात्काळ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. उपविभागीय अधिकारी विजयंत यांच्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या तरतुदीनुसार मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.